आमच्याविषयी
 
To buy your Copy Click here

गायतोंडे' हा ग्रंथ 'चिन्ह'च्याच नव्हे तर मराठी ग्रंथांच्या इतिहासातला देखील सर्वात महागडा ग्रंथ ठरू शकेल. हा ग्रंथ आता लवकरच प्रसिद्ध होत आहे. गायतोंडे यांच्या चाहत्यांसाठी या ग्रंथाची झलक दाखवणारा प्रोमो आम्ही अपलोड करीत आहोत तो पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक यांनी १९७४-७५ साली 'गायतोंडे' यांचं एक पेंटिंग जेजेमध्ये पाहिलं आणि ते अक्षरशः संमोहित झाले. तेव्हा पासूनचा घडलेला सारा  प्रवास त्यांनी 'गायतोंडे' ग्रंथासाठी शब्दबद्ध केला खरा,पण त्याचा विस्तार नंतर सुमारे २० हजार शब्दांपर्यंत जाऊन पोहोचल्यानं तो लेख या ग्रंथासोबतच वेगळा देण्याचा निर्णय घेतला गेला. तोच प्रदीर्घ लेख 'चिन्ह'च्या वाचकांसाठी जसाच्या तस्सा इथं देत आहोत.  

 
चित्रकलेविषयी प्रत्येकाला एक उपजत कुतूहल असतं, कलामाध्यमांविषयी आकर्षण असतं आणि कलाकारांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता तर असतेच असते. हे सारं लक्षात घेऊन सतीश नाईक यांच्या पुढाकारातून १९८७ साली ‘चिन्ह’चा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि साहित्यिक, कलावंत, जाणकार - रसिक वाचकांनी अंकाचं स्वागतच केलं. या अंकातील अभिनव प्रयोगांविषयी कला आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने चर्चा होत राहिली. या अंकाला मानाचे अनेक पुरस्कारही लाभले. त्यानंतर सलग तीन वर्षे (१९८७-८९) ही कलात्मक पदचिन्हे साहित्यजगतावर देखणा ठसा उमटवत राहिली.
दृश्यकलेचा सर्वांगाने वेध घेऊन तिचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर मांडणे हे ‘चिन्ह’च्या संपादनामागचं मुख्य उद्दिष्ट होतं. चित्रकला हा विषय तोपर्यंत प्रसिद्धीमाध्यमांकडून; विशेषत: मराठी वृत्तपत्रांकडून पूर्णपणे दुर्लक्षिला गेला होता. कला आणि पत्रकारिता अशा दोन्ही विभिन्न क्षेत्रात सहजतेनं वावरणा-या सतीश नाईक यांना हे दुर्लक्ष अस्वस्थ करत होतं. कुणीतरी काहीतरी करायला हवं होतं; तर मग ते आपणच का करू नये या भावनेतूनच ‘चिन्ह’ची निर्मिती झाली.
पण ‘चिन्ह’ची निर्मिती मात्र सोपी नव्हती. अंकाच्या संपादनाचं अतिशय चिकित्सक आणि वेळखाऊ काम एकहाती करताना ‘चिन्ह’चा दर्जा सातत्यानं टिकवण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. पण पत्रकारितेतली नोकरी सांभाळून ‘चिन्ह’चं आर्थिक गणित जमवण्याचा ताण मात्र न झेपणारा होता. त्यातूनच ‘चिन्ह’चं प्रकाशन थांबविण्याचा निर्णय सतीश नाईक यांना घ्यावा लागला. त्यामुळे नंतरची तब्बल बारा वर्षं ‘चिन्ह’ प्रकाशित झाला नाही.
या कालावधीत ‘चिन्ह’च्या चाहत्यांना अंकाचं प्रसिद्ध न होणं डाचत राहिलं. ‘चिन्ह’बद्दल कला आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने विचारणा होत राहिली. २००० साली सतीश नाईक यांनी पत्रकारिता सोडली आणि मग मात्र ‘चिन्ह’चा वनवास संपलाच. नवे विषय, नव्या कल्पना,नवी मांडणी - नवे प्रयोग यांचा मिलाफ साधत ‘चिन्ह’चं दुसरं ; पण अधिक जोमदार पर्व सुरु झालं .
वारली आणि मधुबनी चित्रकलेला जगासमोर आणण्याचं कार्य केलेल्या भास्कर कुळकर्णींसारख्या कलावंताच्या अद्भूत आयुष्याचा वेध घेणारा, गायतोंडेंसारख्या लोकविलक्षण कलावंताच्या आयुष्याचे आत्तापर्यंत कोणीही न उलगडू शकणारे पैलू मांडणारा, चित्रकलाशिक्षणविषयक आणि जेजे तसेच कलाशिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार उघडकीला आणणा-या अशा अनेक वेगळ्या विषयांवर आधारित बहुमोल विशेषांक ‘चिन्ह’ने काढले. चित्रकलेविषयीची उत्सुकता शमविण्याच्या मूळ कल्पनेच्या कितीतरी पलिकडे जात ‘चिन्ह’ने वाचकांना चित्रकलेविषयी विचार करायला भाग पाडलं हे ‘चिन्ह’चं फार मोठं यश म्हणता येईल!
चित्रकला हा विषय शिकणा-या गेल्या तब्बल वीस – बावीस वर्षातील प्रत्येक पिढीतल्या विद्यार्थ्यांच्या नजरेखालून ‘चिन्ह’चे अंक गेले आहेत. मराठी वाचकांनी या समृद्ध अंकावर भरभरुन प्रेम केलं. आता सहस्रकाचं पहिलं दशक संपत असताना, माहिती तंत्रज्ञानाचं युग अत्युच्च शिखरावर पोचत असताना ‘चिन्ह’नेही महाजालाच्या या नव्या तांत्रिक पर्वात सहभागी होण्याचं ठरवलं आहे. जगभरातल्या वाचकवर्गाला ‘चिन्ह’पर्यंत सहज पोहोचता यावं, मराठी न जाणणा-या वाचकवर्गालाही ‘चिन्ह’ वाचणं, त्याबद्दल जाणून घेणं सोयीचं जावं या हेतूनं ‘चिन्ह’चं इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेतलं हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे. ‘चिन्ह’च्या वार्षिक अंकाव्यतिरिक्तही वर्षभरात बरंच काही वाचकांना सांगण्यासारखं ‘चिन्ह’कडे सातत्यानं शिल्लक रहात असतं. ते वाचकांना सांगावं आणि वाचकांसोबतचा हा संवाद सतत सुरु रहावा यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतले ब्लॉग्जही सुरु झाले आहेत.
 
संकेतस्थळकर्ते
 
संकल्पना
सतीश नाईक
 
संकेतस्थळ संपादक
ललिता कोल्हारकर
सहाय्य
शर्मिला फडके
अमेय बाळ
 
संरचना
सुनील गरूड
 
 
 
+Click on the image to magnify
Follow us